Tuesday, 22 May 2018

अभ्यासात मागे पडणारी मुलं

‘अभ्यासात मागे पडणारी मुलं’ हा शिक्षक, पालक सर्वांच्याच चिंतेचा विषय! गतिमंदत्व, मतिमंदत्व, स्वमग्नता, बहुविकलांगता इतर शारीरिक ,मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग, अतिचंचलता या कारणांमुळे सर्वसाधारणतः मुलं अभ्यासात माग पडतात. पण यापेक्षा वेगळा असणारा मुलांचा एक गट आहे जो आपल्या सर्वांनाच बुचकळ्यात टाकतो. या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नसतं, ती दिसतातही चारचौघांसारखी! त्यांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण, चांगली, उत्तम, अतिउत्तम असते. विषय आकलन चांगलं होत असल्यानं ही मुलं तोंडी उत्तरही व्यवस्थित देऊ शकतात. पण लेखी परीक्षेत मात्र ती नापास होतात. ही मुलं म्हणजेच ‘अध्ययन समस्या’ असलेली मुलं! “डॉ. शांता वैद्य स्मृती प्रतिष्ठान---मैत्र” या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ‘अध्ययन समस्या’ असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो. आमच काम शिक्षक, पालक, ही मुलं या तिन्ही पातळ्यांवर चालत. या मुलांना केवळ ‘शिकवणी’ला पाठवून, त्यांना शिक्षा करुन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वानीच हा विषय समजावून घेणं आणि एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे.