लढाई अध्ययन समस्येशी!
अभ्यासात मागे
पडणारी मुलं हा पालक, शिक्षक सर्वांच्याच चिंतेचा विषय! अभ्यासात मागे पडण्याची कारणं भिन्न भिन्न असतात. अंधत्व, कर्णबधिरता, इतर शारीरिक अपंगत्व यामुळे अभ्यास
करायला अडचण येते; तसेच
मतिमंदत्व, गतिमंदत्व, स्वतमग्नता, बहुविकलांगता अशा बौद्धिक, मानसिक स्तरांशी निगडीत असलेल्या
प्रश्नांमुळेही मुलं अभ्यासात मागे पडतात. या सर्व विशेष अडचणींवर मात कारण्यासाठी
त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे .
या सर्वांपेक्षा
वेगळ्या गटात मोडणारी काही मुले देखील अभ्यासात मागे पडत असतात. ही मुले 'अध्ययन अक्षम ' मुले म्हणून ओळखली जातात. या
मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण,
चांगली, उत्तम
असते. त्यांच्यामध्ये कोणतेही शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व्यंग नसते. ही मुले वरील पैकी
कोणत्याही गटात मोडत नाहीत आणि तरीही अभ्यासात मागे पडत असतात. मेंदूची कामं करण्याची भिन्न पद्धत, अध्ययनासाठी
आवश्यक असलेल्या काही घटकांमधला बदल आणि अनुवांशिकता या कारणामुळे हे होते. जगभरातील आकडेवारीनुसार दहा टक्के लोक हे या
गटात मोडतात. आपण नुसत्या पुण्याच्या लोकसंख्येचा विचार केला, तरी हे प्रमाण किती प्रचंड असेल याचा
अंदाज बांधू शकतो.
पुणे पालिकेच्या
वेबसाइटनुसार, इयत्ता
पहिली ते चौथी या वयोगटात अंदाजे १,२४,००० मुलं मुली शिकतात. आपण फक्त याच मुलांबरोबर काम करायचं ठरवलं, तरी हि संख्या १२,४००! म्हणजे एकट्या पुण्यात कितीतरी
संस्थांनी यावर काम करायला हवे आहे.
आजमितीस पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली
अशा काही मोजक्या शहरांमध्ये हे काम चालते. पण बहुतांश ठिकाणी पाश्चिमात्य देशांचे
कार्यक्रम जसेच्या तसे राबवले जातात.
या गटात मोडणाऱ्या
मुलांसाठी आम्ही पुण्यात सहकारनगर भागात एक केंद्र सुरु केले आहे. तिथे या
मुलांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याबरोबरच या विषयातील संशोधन आणि विकसनासाठी प्रयत्न
केले जातात; पण
या मुलांचा उल्लेख आम्ही जाणीवपूर्वक "अध्ययन समस्या" असलेली मुलं असा
करतो. "अध्ययन अक्षमता" या प्रचलित शब्दामुळे ही मुले 'अपंग', 'बिचरी' वाटतात.
या मुलांना सर्वसाधारण पद्धतीने अधययन करण्यात समस्या असते ही वस्तुस्थिती आहे; पण याचा अर्थ ती अध्ययन करायला अक्षम
असतात असं नव्हे.
पूर्णतः चारचौघांसारखी
दिसणारी ही मुले लेखन, वाचन, गणित या विषयांमध्ये मागे पडतात. त्यांची बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे
सर्व अभ्यास विषय त्यांना कळतात. तोंडी उत्तरही देते येतात; पण जे समजलं आहे ते अचूकपणे लिहिता येत
नाही. ही मुलं आपल्या पठडीतल्या पद्धतीने शिकू शकत नाहीत; पण
त्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्याला 'रेमेडीअल टीचिंग' असं म्हणतात; पण केवळ 'रेमेडीअल टीचिंग' कारण म्हणजे जखम पूर्ण साफ न करता
मलमपट्टी करण्यासारखं आहे. या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वंकष प्रयत्न
होण्याची गरज आहे.
याच उद्देशानं आमच्या
केंद्रात या मुलांबरोबर काम करताना निरनिराळ्या थेरपींचा वापर केला जातो; तसंच या मुलांमधील विविध क्षमता
ओळखण्यासाठी, त्या
वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या मुलांचा कल ओळखण्यासाठी त्यांची 'कल चाचणी' घेतली जाते व त्यानुसार त्यांनी
कोणत्या क्षेत्रात जाणे फायद्याचे ठरेल या विषयी देखील मार्गदर्शन केले जाते. केवळ
या मुलांबरोबर काम करून थांबता येणार नाही. ही मुले पुढे जायची असतील तर त्यांचे
पालक, शिक्षक आणि
सामाज्याच्याही दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही शिक्षक आणि
पालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेतो.
या मुलांना जशा काही मर्यादा /समस्या असतात
तशीच त्यांची काही बदलस्थानही असतात. या मुलांमध्ये इतरांपेक्षा अधिक कुतूहल असते, त्यांची विचार करण्याची पद्धत खूप
भिन्न असते. निर्मितीक्षमता, कल्पकता, संवेदनशीलता, उच्च भावनांक, इतरांशी संवाद साधण्याची हातोटी, निसर्गविषयक विस्तृत जाणीवा या विषयात
ही मुले चांगली असतात. त्यांच्या या गुणांमुळेच ती शास्त्रज्ञ, संगीतकार, समाजसेवक, राजकारणी, खेळाडू, उद्योजक होऊ शकतात. जगभरात या गटात मोडणारी नावं आहेत- एडिसन, आइनस्टाइन, ग्रॅहम बेल, व्हॉल्ट डिस्ने, चर्चिल, हेनरी फोर्ड. पण ही सर्व नावं पाश्चिमात्य आहेत. कारण त्यांच्याकडे
हा विषय समजावून घेऊन गेले शतकभर काम सुरु आहे. आपल्याकडे मात्र या कामाची अजून पहाट होत आहे. मात्र, सजगपणे
प्रयत्न झाल्यास गटात मोडणारी भारतीय मुलेही त्यांच्यामधील क्षमता सिद्ध करू
शकतील. आता नवीन शासकीय नियमांप्रमाणे ही 'अध्ययन समस्या' असलेली
मुले 'नापास' होऊ शकत नाहीत. पण म्हणून आपण पालक जर
गाफील राहिलो, तर
या मुलांचे नुकसान होत राहील. आता आपली मुले नापास होणार नसली, तरी त्यांना अभ्यासात अडचणी आहेत हे तर
आपल्याला लक्षात येताच असेल. शाळा आठवी-नववी पर्यंत नापास करणार नाही पण पुढे काय? तेव्हा नापास झाल्यावर मग आपल्या
अभ्यासात मागे पडणाऱ्या या मुलांकडे लक्ष देणार आहोत का आपण? तेव्हा फार उशीर झालेला असेल. कारण
आपला मेंदू संस्कारक्षम असतो. त्याला जितक्या लहान वयापासून शास्त्रशुद्ध
प्रशिक्षण मिळेल तितक्या जास्त प्रमाणात मेंदू वेगळ्या पद्धतीने, अधिक चांगले शिकू शकतो. त्यामुळे
शासकीय नियमांची वाट न पाहता तातडीने कामाला लागले पाहिजे. आपले मुलं ही आपली
जबाबदारी आहे शासनाची नाही! या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीच्या उपक्रमात आपणही
सहभागी होऊ शकता. (संपर्क- ९८५०८८३८७५)
-क्षिप्रा रोहित

No comments:
Post a Comment